मुख्य सिग्नलवर डुकरांचा हैदोस : प्रशासनाचे दुर्लक्ष?
बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार परिसरात डुकरांचा मुक्तसंचार : अपघाताची शक्यता, नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळील नवीन सिग्नल परिसरात डुकरांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वर्दळीच्या या मार्गावर अचानक डुकरं रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वार व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रमुख वाहतूक मार्गावरच ही परिस्थिती असताना नगर परिषद प्रशासनाचे याकडे लक्ष का जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. “एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनातील ठेकेदारी कामांबाबत शहरात विविध चर्चा सुरू असल्या तरी त्याला कोणताही अधिकृत दुजोरा नाही. त्यामुळे संबंधित बाबींची वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.
डुकरांचा बंदोबस्त, परिसराची स्वच्छता आणि वाहतुकीला निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भद्रावतीकरांनी केली आहे.



