सोनापूर( देश.) _ टोमटा जलसिंचन योजना तात्काळ सुरू करण्यासाठी तालुका काँग्रेसचा एल्गार.. !
शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करावे अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यात एकमेव असलेली सोनापूर देशपांडे _ टोमटा जलसिंचन योजना जवळपास तीस वर्षापूर्वी १९९५ मध्ये उभारण्यात आली. ही महत्त्वाची जलसिंचन योजना परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी होती. मात्र काही काळ योजना सुरू राहिल्यानंतर शासनाच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली आणि शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
आज निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा आजचा सर्वात गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे बंद पडलेली सोनापूर देशपांडे _ टोमटा जलसिंचन योजना पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे.
या मागणीसाठी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचनकर यांच्या पुढाकाराने शेकडो शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर एल्गार केला. यावेळी जलसंपदा विभागाने तातडीने लक्ष घालून योजनेची पाहणी, आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करून योजना तात्काळ सुरू करण्यासाठी शासनाकडे ठोस प्रस्ताव व पाठपुरावा करावा, अशी मागणी गोंडपिपरी तालुका काँग्रेसने निवेदनातुन करण्यात आली.
याप्रसंगी गोंडपिंपरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचणकर, देविदास सातपुते, राजू चंदेल, धीरेंद्र नागपुरे, महेंद्र कुणघाटकर, राजू राऊत, बालाजी चणकापुरे, दिलीप पुलगमकर, राहुल लडके, अशोक राऊत, पुरुषोत्तम चौधरी, दीपक ठेंगरे, रामदास वाघाडे, सुदर्शन मानकर यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस समर्थित कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
*शेतकऱ्यांना आश्वासन नको, पाणी हवे.!*
वर्षानुवर्षे बंद असलेली ही सिंचन योजना आता कागदावर न ठेवता प्रत्यक्षात सुरू झाली पाहिजे. हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि भवितव्याचा प्रश्न असल्याने शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सोनापूर – टोमटा जलसिंचन योजना तात्काळ सुरू करण्यासाठी निर्णायक कार्यवाही करावी, अशी तालुका काँग्रेसकडून ठाम मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला.



