विदर्भ महाविद्यालयात मतदार नोंदणीचा विशेष कॅम्प
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; ‘जागरूक मतदार, सक्षम लोकशाही’चा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तहसील कार्यालय, जिवती तसेच विदर्भ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मतदार नोंदणीचा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत होते. मार्गदर्शन करताना त्यांनी मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. लोकशाही व्यवस्थेत मतदान हा नागरिकांचा महत्त्वपूर्ण अधिकार असून, प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करून या अधिकाराचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे तसेच इतर पात्र नागरिकांनाही मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कॅम्पदरम्यान विद्यार्थ्यांना नवीन मतदार म्हणून नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, मतदार यादीतील नावाची तपासणी, नाव व पत्त्यातील दुरुस्ती तसेच मतदार नोंदणीशी संबंधित विविध प्रक्रियांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातच मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन झाले.
कार्यक्रमाचे संचालन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. चतुरदास तेलंग यांनी केले. युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची गरज व्यक्त करताना, जागरूक व जबाबदार मतदार घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी कॅम्पमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यास हातभार लागला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. सचिन यनगंदलवार यांनी आभार मानले. त्यांनी तहसील कार्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य, राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.



