नगरपंचायतचा “गजबजलेला परिसर”..मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहाचा विसर..!
स्वच्छतागृहा अभावी नागरिक व महिलांची मोठी गैरसोय ; नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ स्थानिक नगरपंचायत कार्यालय परिसर सध्या शहरातील सर्वाधिक गजबजलेला आणि वर्दळीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. मात्र, इतक्या महत्त्वपूर्ण आणि गर्दीच्या ठिकाणी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने दररोज हजारो नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नगरपंचायत प्रशासनाने या परिसरात तात्काळ स्वच्छतागृह उभारावे,अशी तीव्र मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
बँका, शाळा आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमुळे मोठी वर्दळ या परिसरात दिसून येते. भाग्यश्री बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि एफ.डी.सी. एफ. बँक अशी तीन प्रमुख बँकेची कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे गजानन कॉलेज आणि जनता हायस्कूल या दोन मोठ्या शैक्षणिक संस्था देखील याच भागात असून, काळे कॉम्प्लेक्ससह अनेक मोठी व्यावसायिक दुकाने आणि प्रतिष्ठाने येथे असल्याने ग्राहक, विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांची येथे दिवसभर मोठी रेलचेल असते.एकंदरीत हा परिसर वर्दळीचा असल्याने याठिकाणी स्वतःगृहाची आवश्यकता आहे.
नगरपंचायतने या समस्येचे गांभीर्य ओळखून प्राधान्य क्रमाने या स्थळी सुसज्ज आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील व्यापारी, नागरिक व महिला वर्गाकडून केली जात आहे. आता नगरपंचायत प्रशासन प्रत्यक्षात कधी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपंचायत परिसर हा शहराचे मुख्य केंद्र आहे. येथे दररोज शेकडो ग्रामीण नागरिक आणि महिला विविध कामांसाठी येतात. अशा गजबजलेल्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी व सोयीशी खेळ न करता, तात्काळ या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृहाची निर्मिती करावी. यासाठी आमचा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची तयारी सुजान नागरिकांनी केली आहे.
*प्रशासनाने जागे व्हावे..!*
“स्वच्छ भारत अभियानाच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, मात्र नगरपंचायत प्रशासनाला आपल्या स्वतःच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात मूलभूत सुविधा निर्माण करता आलेली नाही, हे दुर्दैवी आहे. विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींची होणारी कुचंबणा पाहता, या समस्येवर वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू. प्रशासनाने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे.”
— *संदीप रायपुरे (ज्येष्ठ पत्रकार, गोंडपिपरी)*
*तातडीने प्रशासकीय प्रक्रिया..!*
“या परिसरात नागरिकांची वाढती वर्दळ पाहता सार्वजनिक स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे, ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. जागेची उपलब्धता तपासून आणि निधीचे नियोजन करून या ठिकाणी लवकरच सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय दूर करण्यास आमचे प्राधान्य राहील.”
— *विवेक चौधरी* *(मुख्याधिकारी, नगरपंचायत गोंडपिपरी)*
*महिलांची कुचंबणा..!*
“या परिसरात बँका, शाळा आणि दुकाने असल्यामुळे आम्हा महिलांना विविध कामांसाठी येथे यावे लागते. तासनतास थांबवे लागते, पण एकही स्वच्छतागृह नसल्याने आमची मोठी कुचंबणा होते. प्रशासनाने महिलांच्या या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन येथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावे.
– *अरुणा तैलेश वनकर, स्थानिक महिला*
*ग्राहकांची गैरसोय..!*
“काळे कॉम्प्लेक्स आणि आसपासच्या परिसरात शेकडो दुकाने आहेत. येथे ग्रामीण भागातून हजारो ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र स्वच्छतागृहाअभावी ग्राहकांचे, विशेषतः महिलांचे हाल होतात. अनेकदा त्यांना दुकानातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करावी लागते. यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या परिसरात तात्काळ सुविधेची गरज आहे.”
— *अजय माडूरवार ,स्थानिक व्यापारी*



