आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाची चव देणाऱ्या स्वयंपाकीचा “सेवापूर्ती सत्कार सोहळा”
तोहोगाव आश्रमशाळेत गांधी जयंती निमित्य पालक मेळावा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ भारतीय माध्यमिक आश्रमशाळा व स्वर्गीय बाजीरावजी मुन उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा येथे २ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पालक मेळावा आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाची चव देणाऱ्या स्वयंपाकीचा सत्कार सोहळ्याचेही यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या खास प्रसंगी आयोजित विशेष पालक मेळाव्यात उपस्थितांना शासनाच्या विविध शैक्षणिक व सामाजिक कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आश्रमशाळेतील स्वयंपाकी मनोहर दरपुडे यांच्या प्रदीर्घ सेवेनंतरचा ‘सेवापूर्ती सोहळा’ पार पडला. शाळेच्या वतीने त्यांच्या अमूल्य सेवेबद्दल भावुक वातावरणात यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी दरपुडे काका यांनीही आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आणि दरपुडे यांच्या सेवाभावावर आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कोसरे सर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करत महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कडू सर यांनी केले, तर संपूर्ण सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन प्राध्यापक भास्कर उराडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी बोपनवार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अध्यक्षांच्या भाषणानंतर आणि आभार प्रदर्शनाने या त्रिगुणी कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.



