प्लास्टिक-निर्माल्यच्या साफसफाईतून फुलणार तलावाचे सौंदर्य…!
गांधी जयंती व वन्यजीव सप्ताहानिमित्त संयुक्त स्वच्छता मोहीम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ गांधी जयंती व वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून गोंडपिपरी शहरातील डेपो परिसरालगत जंगलात असलेल्या गणेश विसर्जन तलावाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायत गोंडपिपरी, निसर्ग सखा संस्था, चिंतामणी महाविद्यालय गोंडपिपरी आणि वनपरिक्षेत्र कार्यालय धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला असून, या साफसफाईतून तलावाचे सौंदर्य खुलणार आहे.
गोंडपिपरी शहरातील घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन याच तलावात केले जाते. विसर्जनानंतर तलाव परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या, हार, फुले, निर्माल्य तसेच इतर कचरा टाकण्यात आल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती. त्यामुळे गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून संयुक्तपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत तलाव परिसरातील प्लास्टिक, निर्माल्य व अन्य कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासोबतच जंगल परिसरातील वन्यजीवांचे संरक्षण करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
‘स्वच्छ परिसर, निरोगी पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण’ असा संदेश देत नागरिकांनी गणेश विसर्जनानंतर निर्माल्य, प्लास्टिक व इतर कचरा जलस्रोत किंवा जंगल परिसरात न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन करण्यात आले.
स्वच्छता मोहिमेत नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक चौधरी, स्वच्छता विभागाचे उमेश शेंडे, निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे, वनपरिक्षेत्र अधिकारी के.पी. गौरकार, क्षेत्र सहाय्यक बी.टी. पुरी, वनरक्षक नागरे, झारखंडे, कातकर, मेश्राम, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक जे. जे. दत्त, वनमजूर तसेच नगरपंचायतीचे सफाई कामगार व कर्मचारी उपस्थित होते.
चिंतामणी महाविद्यालय गोंडपिपरीचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अधिकारी प्रा. शुभम बावणे, प्रा. किशोर पाईकराव, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ. शरद लखेकर, स्वयंसेवक विद्यार्थी केतन अवथरे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विद्यार्थी, वनविभाग कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी आणि सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तलाव परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमातून केवळ स्वच्छतेचा नव्हे, तर जलस्रोत, जंगल आणि वन्यजीव संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.



