ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजात दोन गटांत रक्तरंजित संघर्ष; दोघांचा मृत्यू, २० आरोपी अटकेत

प्रतापनगरातील वादाचे हत्याकांडात रूपांतर; परस्परविरोधी गुन्हे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : शहरातील प्रतापनगर-भोलेशहा दर्ग्याजवळ दोन गटांत झालेल्या तीव्र संघर्षात दोन जणांचा मृत्यू झाल्याने देऊळगाव राजा शहरात खळबळ उडाली आहे. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या तक्रारींवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख अतिक शेख उमर (वय ३३, रा. प्रतापनगर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास प्रतापनगर-भोलेशहा दर्ग्याजवळील रस्त्यावर आरोपी शेख अकीब शेख पाशु व त्याच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींनी हातात चाकू, लाकडी दांडे व कुऱ्हाडी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमवली. कटकारस्थान रचून पूर्वनियोजित पद्धतीने फिर्यादीच्या नातेवाईकांच्या घरात व घराबाहेर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या हल्ल्यात फिर्यादीचे नातेवाईक आसीफ उर्फ आरीफ हारुन पठाण (वय ३५, रा. देऊळगाव राजा) यांच्यावर कुऱ्हाड व अन्य धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच इतर नातेवाईकांनाही गंभीर दुखापत करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(२), १०९, ३३३, ६१(२), १८९(४), १८९(५), १९०, १९१(१), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरूनही गुन्हा

दरम्यान, दुसऱ्या गटाकडून शेख मुजाहिद शेख अली (वय ४६, रा. हकीम कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास प्रतापनगर-भोलेशहा दर्ग्याजवळील रस्त्यावर शाहरुख खान अहमद खान व इतर व्यक्तींनी कट रचून फिर्यादी व त्यांच्या भावाकडे पाहून जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात फिर्यादीचे भाऊ शेख अनवर उर्फ अनु शेख अली (वय ४२, रा. हकीम कॉलनी, देऊळगाव राजा) यांच्यावर लोखंडी रॉड, चाकू व काठ्यांनी मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. तसेच फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(२), ६१(२), ११८(१), १८९(२), १८९(४), १८९(५), १९०, १९१(१), १९१(३), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० आरोपी अटकेत; उर्वरितांचा शोध सुरू

घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना दिल्या.

आरोपींच्या शोधासाठी देऊळगाव राजा पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी कारवाई करत दोन्ही गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत एकूण २० आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके कार्यरत आहेत.

शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

घटनेनंतर देऊळगाव राजा शहरातील संवेदनशील भागात स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक आणि क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता कुवारे करीत आहेत.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर लोकांच्या भावना दुखावतील किंवा अफवा पसरतील, असे संदेश प्रसारित करू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संशयास्पद माहिती किंवा घटनेबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी ती तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी आणि देऊळगाव राजा पोलिस पथकाकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये