पावसाळी धान पीक करपले, सरसकट मोबदला द्यावा
राहुल संतोषवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
यंदाच्या पावसाळी हंगामात वातावरणातील बदल, कमी पाऊस आणि विविध रोग-किडींच्या प्रादुर्भावामुळे धान पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये धानाचे पीक करपल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु कमी पावसामुळे पिकांच्या वाढीच्या काळात प्रतिकूल तलावं कोरडे पडले व हवामानाचा परिणाम झाला. धानावर कडा करपा, खोडकीड यांसह विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले. औषध फवारणी करूनही अनेक ठिकाणी अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.
पीक हातातून गेल्याने लागवड, खते, औषधे, मजुरी यासाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
*या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी शासनाकडे मागणी केली आहे की -*
> नुकसानग्रस्त शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, पीक नुकसान भरपाई द्यावी तसेच शासनाने सरसकट सर्व शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी.
शासनाकडून मदत मिळाल्यास संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित केले जाते का आणि शासन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



