ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोडशी बूजच्या सरपंचपदी उमेश कोल्हे कायम; अविश्वास ठरावानंतर जनतेने पुन्हा दिला कौल

‘सरपंच होय, कायम’च्या बाजूने ५५५ मते; विरोधात ४२१, २५ मते अवैध — निकालानंतर गावात जल्लोष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा : कोडशी बूज ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश कोल्हे यांच्यावर नऊ विरुद्ध एक अशा मतांनी अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाल्याने मंगळवार, दि. ६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जनतेने पुन्हा उमेश कोल्हे यांच्या बाजूने कौल देत त्यांना सरपंचपदी कायम ठेवले आहे.

कोडशी बूज ग्रामपंचायतीमध्ये एकूण १००८ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १००१ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला. मतमोजणीनंतर ‘सरपंच होय, कायम’ या बाजूने ५५५ मते, तर विरोधात ४२१ मते पडली. २५ मते अवैध ठरली. त्यामुळे उमेश कोल्हे यांना जनतेचा स्पष्ट कौल मिळाला.

कोडशी बूज ही कोरपणा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत असून नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत मागील सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली होती. त्यामुळे अविश्वास ठरावानंतर झालेल्या या निवडणूक प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

अविश्वास ठरावाला जनतेच्या मतदानातून उत्तर

उमेश कोल्हे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. मात्र सरपंचाची निवड थेट जनतेतून झालेली असल्याने अंतिम निर्णय पुन्हा जनतेच्या मतपेटीतून झाला. मतदानाच्या निकालाने अविश्वास ठरावानंतरही मतदारांनी उमेश कोल्हे यांच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोडशी बूज ग्रामपंचायतीअंतर्गत कोडशी बूज आणि गांधीनगर या दोन गावांचा समावेश आहे. थेट निवडून आलेल्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव झाल्यानंतर पुन्हा जनतेमध्ये मतदान होण्याची ही जिल्ह्यातील दुसरी वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी बाळाजी कदम, तहसीलदार पल्लवी आखरे, गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, नायब तहसीलदार करिष्मा वासेकर यांच्यासह पोलीस प्रशासन व पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले आदि सह अघिकारी व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये