ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लेंडाळा शेतशिवारात वाघाचा वाढता वावर

वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ शहराला लागून असलेल्या लेंडाळा शेतशिवार परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढला असून, पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक गौरव नागपुरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. के. डब्ल्यू. धानकुटे साहेब यांची भेट घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले.

लेंढाळा परिसरात सुमारे दहा दिवसांपूर्वी विठ्ठल गाडगे यांच्या गायीवर वाघाने हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. त्यानंतर दि. ५ ऑक्टोबर रोजी वाघाने एका म्हशीवर हल्ला केल्याची घटना समोर आली. सलग घडलेल्या या घटनांमुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लेंढाळा शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतकरी नियमितपणे शेतीची कामे करीत असल्याने वाघाचा वावर असलेल्या परिसरात त्यांचा वन्यप्राण्यांशी संपर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने परिसराची तातडीने पाहणी करून वाघाच्या हालचालींची नोंद घ्यावी, आवश्यक ठिकाणी कॅमेरे व ट्रॅप बसवावेत, वनविभागाची गस्त वाढवावी तसेच वाघाच्या वावराच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच शेतकरी व नागरिकांनी वाघाच्या वावराच्या परिसरात एकट्याने जाऊ नये, पहाटे व सायंकाळच्या वेळी विशेष दक्षता घ्यावी, वाघ दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये अथवा गर्दी करू नये, याबाबत वनविभागामार्फत जनजागृती व अधिकृत सूचना देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी रब्बानी शेख, भारत नागपुरे, दिलीप नागपुरे, विठ्ठल गाडगे, धनराज भोंडे, निखिल ताटेवार, सुबोजित सरकार,प्रदीप रणदिवे, संदीप मोरे, रमेश पारखी व संदीप बनपूरकर,ललित नागपुरे उपस्थित होते.

मानवी जीवितासह शेतकऱ्यांच्या जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने वनविभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये