ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जेना नाल्यातून बिनापरवाना रेती वाहतूक : ९.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास रेती जप्त : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ जेना नाल्यातून कोणताही वैध परवाना नसताना रेती काढून तिची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर, क्रमांक नसलेली ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुषांत मुकींदा कुळमेथे (वय २६, रा. किलोनी, ता. भद्रावती) आणि गजानन पिंपळकर (रा. जेना, ता. भद्रावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ टीसी ००६ मधून रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगण्यात आले. पंचांसमक्ष ट्रॉलीची तपासणी केली असता क्रमांक नसलेल्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती आढळली.

पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉलीसह रेती ताब्यात घेतली. ट्रॅक्टरची अंदाजे किंमत सात लाख, ट्रॉलीची दोन लाख, तर रेतीची आठ हजार रुपये अशी एकूण किंमत ९ लाख आठ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चौकशीत सदर ट्रॅक्टर व ट्रॉली गजानन पिंपळकर यांच्या मालकीची असून, जेना नाल्यातून रेती भरून ती अरविंदो कंपनीत खाली करण्यासाठी पाठविल्याचे चालकाने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पेट्रास साकराम सिदाम करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये