ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवरात्र उत्सव २०२६ अनुषंगाने दुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नवरात्र उत्सव २०२६ शांततामय, शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडावा, या उद्देशाने दि. ०५.१०.२०२६ रोजी दुपारी १२.०० वा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील दुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे आयोजित करण्यात आली.

सदर बैठकीमध्ये नवरात्र उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, मा. जिल्हाधिकारी यांचे लेझर लाईट वापरास प्रतिबंध करणारे आदेश तसेच बीएनएसएस कलम १६३ अन्वये डीजे वापराबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश याबाबत पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या.

बैठकीत नवरात्र उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३६ व ३८ अन्वये निर्गमित आदेशांचे पालन करणे, लेझर लाईट वापराबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश तसेच मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

गरबा व दांडिया कार्यक्रमांचे योग्य नियोजन, महिला व मुलींची सुरक्षा, मंडप व अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही व्यवस्था, वाहतूक व पार्किंग व्यवस्था तसेच सोशल मीडिया व अफवा नियंत्रणाबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. नवरात्र उत्सव तसेच गरबा दांडिया कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊनच कार्यक्रम आयोजित करावेत. ध्वनीवर्धकाचा वापर निर्धारित नियम व वेळेच्या मर्यादितच करावा. प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर करू नये. कार्यक्रमस्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था, महिला स्वयंसेवक व सुरक्षा स्वयंसेवकांची व्यवस्था करावी तसेच सीसीटीव्ही व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

महिला व मुर्लीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन छेडछाड व गैरवर्तनाविरुद्ध “Zero Tolerance” धोरण अवलंबावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास अथवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी स्वतःहून कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित माहिती अथवा धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित करू नये. सामाजिक शांतता, सुरक्षितता व सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

प्रत्येक मंडळाने “एक मंडळ एक जबाबदार पदाधिकारी एक पोलीस अंमलदार” या संकल्पनेनुसार पोलीस प्रशासनाशी समन्वयासाठी एका जबाबदार पदाधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधित पोलीस अंमलदाराशी नियमित संपर्क व समन्वय ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या.

यावर्षी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून दामिनी पथक, महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती, नारीशक्ती व सामाजिक प्रबोधन, कन्या/महिला गौरव, महिला नेतृत्व व निर्णय प्रक्रियेत सहभाग, महिला आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता व शासन योजनांची माहिती, मुलींचे शिक्षण, करिअर व नेतृत्व विकास, सामाजिक बांधिलकी व समाजोपयोगी उपक्रम, पर्यावरण व स्वच्छता, सुरक्षित उत्सव व्यवस्थापन व पोलीस समन्वय, नाविन्यपूर्ण संकल्पना व एकूण आयोजन तसेच “Save Water” संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम यांना प्रोत्साहन देण्यासाठी “नवदुर्गा सन्मान-२०२६” पुरस्कार स्पर्धेचे पोलीस ठाणे स्तरावर आयोजन करण्यात आले आहे.

वरील विषयांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दुर्गा मंडळांना पोलीस ठाणे तसेच जिल्हा स्तरावर पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिली.

पोलीस प्रशासन व दुर्गा मंडळे यांच्या संयुक्त जबाबदारीतून “सुरक्षित नवरात्र” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. यावर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गा मंडळांनी “Save Water” ही संकल्पना राबवून पाणी बचत व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केले व उपस्थितीत दुर्गा मंडळांचे पदाधिकारी यांनी मांडलेल्या अडचणी व समस्यांचे पोलीस अधीक्षक वर्धा यांनी निराकरण करुन मार्गदर्शन केले व वर्धा वासियांना नवरात्र उत्वाच्या शुभेच्छा दिल्या.

सदर बैठकीस श्री. प्रमोद मकेश्वर, पोलीस उपअधीक्षक (गृह), पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, वर्धा व ठाणेदार वर्धा शहर, सेवाग्राम, सावंगी तसेच जिल्ह्यातील विविध दुर्गा मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये