ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी – आ. किशोर जोरगेवार.

विदर्भ बुरूड समाज संघटनेच्या त्रैमासिक सभेत समाजबांधवांशी साधला संवाद.

चांदा ब्लास्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वाभिमानाचा आणि प्रगतीचा अधिकार मिळाला. संविधानाने दिलेल्या या अधिकारांमुळेच समाजातील सर्वसामान्य व्यक्तीलाही लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठ पर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. आज मी आमदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व करू शकतो, यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान आणि त्यातून मिळालेला समानतेचा अधिकार हीच मोठी शक्ती आहे. त्यांच्या संविधानामुळे बुरूड समाजातील प्रत्येकालाही प्रगतीची संधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

विदर्भ बुरुड समाज संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची त्रैमासिक सभा रविवारी बुरूड समाज सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी समाजातील विविध प्रश्न, अपेक्षा आणि समाजाच्या विकासाच्या वाटचालीबाबत त्यांनी उपस्थितांशी चर्चा केली. समाजबांधवांच्या भावना, अडचणी आणि सूचना जाणून घेत त्यांच्या अपेक्षांवरही त्यांनी संवाद साधला.

यावेळी विदर्भ बुरूड समाजाचे अध्यक्ष अॅड. ईश्वर चर्लेवार, महासचिव विवेक चिलवरवार, नागपूर विभागाचे उपाध्यक्ष सुरेश पुट्टेवार, अमरावतीचे उपाध्यक्ष रमाकांत सुलभेवार, संघटक सचिव दिपांजली मंथनवार, निलेश कनकेनवार, स्वाती वडपल्लीवार, राहुल मोहितेवार, राजेश शंग्रपवार, अनुराधा पल्लडवार, मोहित मादेवार, राजेश सुलभेवार, संजय मांजरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गुड्डू चंदेवार, शहराध्यक्ष सुनील दर्शनवार, पंकज जोरगेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, समाजाचा विकास हा केवळ एका व्यक्तीच्या किंवा एका संस्थेच्या प्रयत्नातून होणार नाही. त्यासाठी समाजातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन, युवकांची ऊर्जा आणि सर्व समाजबांधवांची एकजूट आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न झाले पाहिजेत. युवक-युवतींना शिक्षण, रोजगार आणि विविध क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतानाच समाजातील गरजू घटकांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण देशाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणारे महामानव होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, संघर्ष केला आणि देशाच्या संविधान निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक भारतीयाला समान अधिकार दिले. त्यामुळे आज समाजातील वंचित, दुर्बल आणि सामान्य घटकांतील व्यक्तीलाही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पुढे जाण्याची संधी मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपल्याला समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला आहे. या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून समाजाच्या विकासासाठी योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे. शिक्षण, संघटन आणि सामाजिक एकजुटीच्या माध्यमातून बुरूड समाजाने विकासाच्या दिशेने पुढे जावे, असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी समाजबांधवांनी विविध प्रश्न, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. सभेला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये