बाजार मार्केट परिसरातील वाहतूक व्यवस्थेसाठी सर्वपक्षीय एकवटले
दुर्दैवी अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगरपरिषदेकडे ठोस उपाययोजनांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील बाजार मार्केट परिसरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिक, व्यापारी, पादचारी तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. १ ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बाजार परिसरातील वाहतूक व्यवस्था तातडीने सुरळीत व सुरक्षित करण्याची मागणी करीत सर्वपक्षीय नागरिक व व्यापारी बांधवांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले.
या निवेदनात बाजार मार्केट परिसरातील वाहतूक व्यवस्था तातडीने सुधारावी, जड वाहनांसाठी योग्य पर्यायी मार्ग निश्चित करावा, बाजार परिसरातील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण व इतर अडथळे तातडीने हटवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स व वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी. भविष्यात अपघात होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करावे आणि संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून प्रश्नावर तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या बालकाच्या पालकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या सर्वपक्षीय निवेदनात भाजपचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, काँग्रेस शहराध्यक्ष भूपेश कायरकर, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेविका उषा जाधव, कल्पना मत्ते, अनघा सातपुते, अविनाश पारोधे, संदीप चटपकर, शिवसेनेचे सुयोग भोयर यांच्यासह सर्व विरोधी नगरसेवक व नगरसेविकांचा सहभाग होता.
बाजार परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका लक्षात घेता प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा सर्वपक्षीय प्रतिनिधींनी व्यक्त केली.



