“गणराया ॲवॉर्ड-२०२६ अंतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांचा वर्धा पोलीस दलाकडुन गौरव…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ निमित्त वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणराया ॲवॉर्ड-२०२६ या संकल्पने अंतर्गत पोलीस ठाणे स्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेमध्ये सहभागी सार्वजनिक गणेश मंडळांचे सायबर सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी जनजागृती, महिला व बालसुरक्षा, वाहतूक सुरक्षा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, आरोग्य तपासणी व प्रतिबंधात्मक आरोग्य अभियान तसेच कायदा व सुव्यवस्था व शिस्त या विविध निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.
पोलीस स्टेशन स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मंडळांची तसेच प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी पात्र मंडळांची निवड करण्यात आली. निवड समितीमार्फत निवड करण्यात आलेल्या या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांचा गणराया ॲवॉर्ड-२०२६ पुरस्कार वितरण समारंभ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी ०४ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे संपन्न झाला.
या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा व श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा यांचे हस्ते प्रथम पुरस्कार श्री बाल गणेश मंडळ केळकरवाडीचा राजा, वर्धा, व्दितीय पुरस्कार:- बाल गणेश मित्र मंडळ समिती, देवळी, तृतीय पुरस्कार: न्यू बाल गणेश मंडळ, आनंदवाडी यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोपटे देऊन करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच १. बालगोपाल गणेश मंडळ, बाजारवाडा, २. संत काळे महाराज बाल गणेश मंडळ, खरांगणा ३. बारभाई गणेश मंडळ, सेल यांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोपटे देवून गौरव केला.
श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी आपले अध्यक्षीय भाषणात सांगीतले की, उपक्रमाचा उद्देश सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी जनजागृती, महिला व बालसुरक्षा, वाहतूक शिस्त, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक ऊस जनजागृती तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देणे हा होता.
पुरस्कार वितरण समारंभाचे प्रास्ताविक श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केले व कार्यक्रमातील उपस्थित सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा जिल्हा, गणेश मंडळाचे पदाधिकारी, जिल्हयातील पत्रकार बांधव, ठाणेदार, अधिकारी, अंमलदार, पोलीस पाटील, तसेच मंडळांना नियुक्त करण्यात आलेले पोलीस अंमलदार उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, जनजागृती, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सपोनि मिलींदकुमार दवणे, जिल्हा विशेष शाखा, वर्धा यांनी केले.



