एमबीबीएस प्रवेशाने अथर्वच्या आयुष्याला ज्ञानरूपी अर्थ.!
गोंडपिपरीचा अथर्व ओम बोनगीरवार होणार डॉक्टर ; कानपूरच्या प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी येथील उद्योजक ओम बोनगीरवार यांचे चिरंजीव अथर्व ओम बोनगीरवार याने नीट परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत कानपूर येथील प्रतिष्ठित डॉ. बी. एस. कुशवाह मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आहे. अथर्वच्या या यशामुळे त्याच्या आयुष्यात खरा ज्ञानरूपी अर्थ प्राप्त झाला असून, बोनगीरवार परिवारासह गोंडपिपरी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अथर्वने इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण लांब राहून बुलढाणा येथील प्रतिष्ठित सहकार विद्या मंदिर येथे पूर्ण केले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण घेत असताना त्याने नांदेड येथील IIB इन्स्टिट्यूटमधून नीट परीक्षेची तयारी केली. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्याने NEET परीक्षेत चांगले गुण मिळविले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कानपूर येथील डॉ. बी. एस. कुशवाह मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.
अथर्वने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. शालेय जीवनापासूनच अभ्यासात सातत्य ठेवत त्याने नीट परीक्षेसाठी कठोर परिश्रम केले. अखेर त्याच्या मेहनतीला यश मिळाले असून, आता ‘डॉक्टर’ होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली आहे.
अथर्वच्या या यशाचे विशेष महत्त्व म्हणजे बोनगीरवार कुटुंबातील पहिला डॉक्टर होण्याचा मान त्याला मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला आहे.
अथर्वचे वडील ओम बोनगीरवार, आई दीपाली बोनगीरवार, आजोबा अरुण श्रीहरी बोनगीरवार तसेच आजी स्वर्गीय करुणा बोनगीरवार यांच्या संस्कारांचा आणि प्रोत्साहनाचा अथर्वच्या यशात मोठा वाटा आहे. त्याच्या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि गोंडपिपरी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अथर्वच्या यशामुळे बोनगीरवार परिवारात आनंदाचे वातावरण असून, त्याने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी आणि भविष्यात उत्तम डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करावी, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



