ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पक्षांच्या किलबिलाटात कोठारी वनपरिक्षेत्रात “पक्षी निरीक्षण”

वन्यजीव सप्ताहानिमित्य "बर्ड वॉक" उपक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी वनपरिक्षेत्राच्या वतीने करंजी क्षेत्रात “बर्ड वॉक” या विशेष निसर्ग व पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वनकर्मचारी तसेच निसर्गप्रेमींमध्ये पक्ष्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, स्थानिक पक्षीविविधतेची ओळख करून देणे आणि पक्षी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या उपक्रमादरम्यान सहभागींची निसर्गभ्रमंती व पक्षी निरीक्षण करण्यात आले. कोठारी वनपरीक्षेत्र अधिकारी तथा वन्यजीव अभ्यासक श्री रुंदन कातकर व श्री मुकेश भांदककर (मानद वन्यजीव रक्षक,चंद्रपूर) यांनी विविध अधिवासांमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांचे ओळख वैशिष्ट्ये, अधिवास, आहार, प्रजनन, वर्तन तसेच परिसंस्थेतील त्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. पक्षी हे परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्वपूर्ण निर्देशक असून त्यांच्या संवर्धनासाठी नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पक्षी निरीक्षणादरम्यान परिसरात आढळलेल्या विविध ४५ पक्षी प्रजातीची नोंद इ_बर्ड या पक्षी निरीक्षणाची नोंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागतिक ऑनलाइन व्यासपीठावर घेण्यात आली. त्यात सुगरण, धीवरपक्षी, पाणकावळे, सर्पपक्षी, होले, टिटवी, तिरचिमणी, पोपट, शिंपी, वटवटे, शिक्रा, सातभाई, चंडोल, वेडाराघू, कोतवाल, भारिट, सुतार, बगळे, ढोकरी, इत्यादी पक्ष्यांचा किलबिलाटासह प्रत्यक्ष निरीक्षण अनुभवता आले.

सहभागी कर्मचाऱ्यांना पक्षी निरीक्षणाची शास्त्रीय पद्धत, पक्ष्यांचे आवाज व हालचालींच्या आधारे ओळख तसेच पक्षी अधिवासाचे निरीक्षण याबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

‘निरीक्षणातून ज्ञान, ज्ञानातून संवर्धन’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वनकर्मचाऱ्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेबाबत अधिक आस्था निर्माण होण्यास मदत झाली. वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून पक्षी व त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला कोठारी वन परिक्षेत्रातील वनपाल गेडाम, पिल्लारे, ढुमणे, श्रीमती गेडाम तसेच वनरक्षक रामगिरकर, बोरे, शेख, कावळे, बोडे, साखरकर, कु घोळवे, कु.प्रतापगीरवार व वनमजुर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री पिल्लारे, वनपाल करंजी यांनी विशेष सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये