ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांधी जयंतीला भद्रावतीत ओबीसींचा शांततापूर्ण बैठा सत्याग्रह : ‘वैष्णव जन तो’ भजनातून सत्याग्रहाचा संदेश

ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी सर्व समाजबांधव एकवटले : ज्येष्ठ नागरिकांच्या स्वच्छता मोहिमेने वेधले लक्ष!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण बैठ्या सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या विचारांचा जागर करीत विविध समाजघटकांनी या सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

   कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या ज्येष्ठ सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून विशेष सहभाग नोंदविला. ज्येष्ठ नागरिकांचा हा उत्स्फूर्त सहभाग उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

याप्रसंगी आस्थदायी धनोजे कुणबी समाजाचे पांडुरंग टोंगे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, विद्यमान नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते ग्राहक पंचायतीचे पुरुषोत्तम मत्ते, मार्गदर्शक राजेश बदखल, महेश ठेंगणे, ऍडव्होकेट मत्ते यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि विविध समाजांतील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्याग्रहादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रिय असलेले ‘वैष्णव जन तो’ हे भजन सामूहिकरीत्या गाऊन शांततेचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी जनजागृती करण्यासोबतच समाजातील सर्व घटकांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, भद्रावतीत परंपरेप्रमाणे राष्ट्रपिता नगरविकास मंचच्या वतीने महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, विजय भोयर, रवी पवार, प्रकाश दास यांच्यासह मंचचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भद्रावती शहर शाखेचे अध्यक्ष भूपेश कायरकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुभान भाई सौदागर, सूरज गावंडे, अविनाश पारोधे, संदीप चटपकर , दिलीप मांढरे, दिलीप ठेंगे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.

गवराळा येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या ज्येष्ठ सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत घेतलेला पुढाकार विशेष होता!

एकीकडे राष्ट्रपिता नगरविकास मंच यांचा महात्मा गांधी विचारांचा जागर, दुसरीकडे ओबीसी हक्कांसाठी शांततापूर्ण सत्याग्रह आणि त्याचबरोबर स्वच्छतेचा सामाजिक संदेश… अशा त्रिवेणी संगमातून भद्रावतीत महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक एकता, स्वच्छता आणि न्याय्य हक्कांचा संदेश देणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये