ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धानापूर जिल्हा परिषद शाळा पथनाट्य स्पर्धेत प्रथम

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत गोंडपिपरीत तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धा ; विद्यार्थ्यांकडून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ सेवा संकल्प अभियानांतर्गत गोंडपिपरी येथील कन्या माध्यमिक विद्यालयात १ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर आधारित पथनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृतीचा संदेश दिला. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, धानापूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध शैक्षणिक योजना उपलब्ध आहेत. या योजनांची माहिती पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, या उद्देशाने धानापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शासनाच्या विविध उपक्रमांची जनजागृती या माध्यमातून करण्यात आली.

या स्पर्धेत माध्यमिक विद्यालये तसेच जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी अभिनय, संवाद आणि सामाजिक संदेशाची प्रभावी मांडणी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पथनाट्याच्या माध्यमातून अवघड विषयही सहज आणि प्रभावीपणे मांडता येतो, हे विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले.

धानापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विजयी पथनाट्यात शिव वेट्टी, रौनक मडावी, जय कुमरे, आयुष आत्राम, अंश कुळमेथे, वैभव, मरसकोल्हे, शुभा डोंगरकर, अनुष्का आलाम आणि आरोही मडावी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिका सुचिता वाकडे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेखर दहिवले, तसेच सहाय्यक शिक्षक रणजीत तेलकापल्लीवार, बंडू कण्णाके आणि गुरुदास कुबडे यांच्यासह शिक्षकवर्ग व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विषयांची जाण, संवादकौशल्य आणि जनजागृतीची भावना विकसित होण्यास मदत झाली. धानापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेला प्रथम क्रमांक हा शाळेच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमातील उल्लेखनीय यश मानले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये