ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बससेवेसाठी शहरी युवा कार्यकर्त्यांचा लढा.!

डोंगरगावच्या विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा प्रश्न ऐरणीवर ; भाजपा शहराध्यक्ष चेतनसिंह गौर यांच्या नेतृत्वात बसस्थानक प्रशासनाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी बसच्या वेळेअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचता यावे, त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ व्हावा, या मागणीसाठी गोंडपिपरी येथील युवा कार्यकर्त्यांकडून एसटी बसस्थानक प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

डोंगरगाव येथून दररोज शाळा व महाविद्यालयासाठी गोंडपिपरीकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, एसटी बसच्या वेळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाशी सुसंगत नसल्याने त्यांना प्रवासात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तसेच त्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा लक्षात घेऊन भाजप शहराध्यक्ष चेतनसिंग गौर व युवा मोर्चा शहराध्यक्ष वैभव बोनगिरवार यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी एसटी बसस्थानक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांना भ्रमणध्वनीद्वारे समस्या सांगून ती दूर करण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी डोंगरगाव येथील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एसटी बसच्या वेळेबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचता यावे, त्यांचा प्रवास सुरक्षित असावा तसेच बससेवेअभावी त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी थेट संबंधित असलेला हा प्रश्न निर्माण झाल्याने एसटी महामंडळ व संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन डोंगरगावच्या विद्यार्थ्यांच्या बससेवेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित, सुरक्षित आणि वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

*बसच्या वेळेत आवश्यक बदल करण्याची मागणी*

डोंगरगाव परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेचा विचार करून एसटी बसच्या फेऱ्यांच्या वेळेत आवश्यक बदल करावेत अथवा विद्यार्थ्यांना सोयीच्या वेळेत बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विशेषतः सकाळच्या शाळा-महाविद्यालयाच्या वेळेत विद्यार्थ्यांना वेळेत गोंडपिपरी येथे पोहोचता यावे आणि दुपारनंतर सुरक्षितपणे गावाकडे परतता यावे, यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये