येहोवा यिरे सोसायटीतील ठेवीदारांचे कोट्यवधी अडकले
पोंभूर्णा तालुक्यातील ५ कोटींच्या तर जिल्ह्यातील २५ कोटींच्या मुदतठेवी प्रलंबित असल्याचा दावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पत्रपरिषदेत चौकशीची मागणी
पोंभूर्णा :_ येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये मुदतठेवी केलेल्या अनेक ठेवीदारांना मुदतपूर्ती होऊनही त्यांची रक्कम परत मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे.पोंभूर्णा शाखेतील अंदाजे ५ कोटींचे तर जिल्ह्यातील २५ कोटींच्या मुदतठेवी प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची सक्षम प्राधिकरणामार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात पोंभूर्णा येथील पत्रकार भवनात २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सामाजिक कार्यकर्ते इंजि. वैभव पिंपळशेंडे यांनी ठेवीदारांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
पत्रपरिषदेला इंजि. वैभव पिंपळशेंडे, मनिष राऊत, एजंट दिपक सेमले,समिक्षा मेश्राम, राकेश गेडाम यांची उपस्थिती होती.
ठेवीदारांनी विश्वासाने आपली बचत येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये मुदतठेवीच्या स्वरूपात ठेवली. मात्र, मुदतपूर्ती झाल्यानंतरही काही ठेवीदारांना रक्कम परत मिळत नसल्याचा प्रकार लक्षात येताच ठेवीदारांनी बँकेकडे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला मात्र बॅंकेकडून व संचालक मंडळाकडून फक्त तारीख देऊन वेळ मारून नेत असल्याचे सांगण्यात आले.यादरम्यान संस्थाचालकांनी काही ठेवीदारांना चेक दिले होते.ते सुद्धा बाऊन्स झाले असल्याने ठेवीदारांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्रस्त झालेले ठेवीदार यांनी इंजी.वैभव पिंपळशेंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रपरिषद घेऊन संबंधित विभागाचे लक्ष वेधले.
ठेवीदारांकडे एफडी प्रमाणपत्रे, मॅच्युरिटी कागदपत्रे, बँक खात्यांचे उतारे, संस्थेकडे केलेले अर्ज, पावत्या आदी कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी संस्थेच्या
ठेवी, उपलब्ध निधी, मालमत्ता आणि ठेवीदारांच्या पैशांशी संबंधित आर्थिक व्यवहारांची आवश्यक ती तपासणी व लेखापरीक्षण करण्यात यावे.चौकशीत आर्थिक किंवा कायदेशीर अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणीही पत्रपरिषदेत करण्यात आली.
ठेवीदारांकडे एफडी प्रमाणपत्रे, मॅच्युरिटी कागदपत्रे, बँक खात्यांचे उतारे, संस्थेकडे केलेले अर्ज, पावत्या या कागदपत्रांच्या आधारे प्रत्येक ठेवीदाराची मुद्दल रक्कम, एफडी क्रमांक, मुदतपूर्तीची तारीख आणि नियमानुसार देय व्याज निश्चित करावे.
-इंजी.वैभव पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ता,चेक ठाणेवासना
मी मोलमजुरी करून एक एक पै-पै करून योहोवा बॅंकेत पैसा जमा केली. मात्र माझ्या घामाच्या पैश्याची बॅंकेकडून फसवणूक झाली.माझ्या परिवारात माझा पती मंदबुद्धीचा आहे ,सासरा अपंग आहे,माझी मुलगी पाचवीत आहे.बॅंकेत जमा केलेले पैसे मला मिळवून देण्यासाठी प्रशासनाने मदत करावी.
-लिला जितू दिवसे,आष्टा



