विठ्ठलवाड्यात विहिरींची कामे पूर्ण; तरीही शेतकऱ्यांचे अनुदान रखडले
प्रलंबित अनुदान तातडीने देण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कलावती अरुण पुप्पलवार यांचा पाठपुरावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये विठ्ठलवाडा येथे मंजूर झालेल्या विहिरींची कामे पूर्ण होऊनही संबंधित शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःकडील आर्थिक संसाधने खर्च केली. मात्र, कामे पूर्ण झाल्यानंतरही शासनाकडून मिळणारे अनुदान प्रलंबित असल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित देयके अदा करावीत, अशी मागणी पुढे आली आहे.
शेतकऱ्यांची ही अडचण भाजपा महामंत्री कलाताई अरुण पुप्पलवार यांनी पुढाकार घेत मांडली. त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला असून, याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, विठ्ठलवाडा येथील या प्रकरणी निवेदनकर्त्यांमध्ये भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वाती वडपल्लीवार, रवींद्र ताजने, गंगाधर वागदरकर, पार्वता पिंपळकर, भाऊजी फोपरे, रत्नाकर वागदरकर, तुळशीराम आमने, ईश्वर शेंबळकर, कवडू नांदेकर, प्रकाश फोपरे, मधुकर गौरकर यांच्यासह लाभार्थ्यांचा समावेश होता.
*काम पूर्ण, मात्र अनुदानाची प्रतीक्षा*
मनरेगा अंतर्गत विहिरींची कामे पूर्ण झाल्यानंतरही अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रलंबित अनुदान मिळण्यासाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारावे लागत असल्याची स्थिती असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रलंबित देयकांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी आणि अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.



