ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल व यशवंत विद्यालय, वायगाव (निपाणी) येथे विद्यार्थी सुरक्षेबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
१९३० आणि ११२ या आपत्कालीन हेल्पलाईन नंबरचा प्रभावी वापर करण्याचे पोलीस दलाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विद्यार्थ्यांमध्ये स्वसुरक्षा, इंटरनेट व डिजिटल जगातील धोके, वाहतुकीचे नियम आणि कायद्याविषयी जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल व यशवंत विद्यालय, वायगाव (निपाणी) येथे संयुक्तपणे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मुला-मुलींना स्वसुरक्षा, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा तसेच पोक्सो (POCSO) कायदा अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भरोसा सेल तसेच दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) माधुरी वाघाडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना आणि ममता उपस्थित होत्या. त्यांनी दैनंदिन जीवनात सतर्क कसे राहावे, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी कसा संपर्क साधावा, याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती दिली. मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी 1930 आणि 112 या महत्त्वाच्या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकांचा वापर केव्हा आणि कसा करावा, याबद्दल विशेष माहिती देण्यात आली.
हेल्पलाईन १९३० (सायबर क्राईम हेल्पलाईन): ऑनलाईन सायबर फसवणूक किंवा आर्थिक फ्रॉड झाल्यास तात्काळ ‘१९३०’ या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा. फसवणूक झाल्यापासून पहिल्या काही तासांत (गोल्डन अवर) या क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळण्याची शक्यता अधिक असते, असे सांगण्यात आले. हेल्पलाईन ११२ (आणीबाणी प्रतिसाद यंत्रणा ERSS): कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती, जसे की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला व मुलांवरील अत्याचार किंवा सुरक्षिततेचा धोका, अपघात किंवा तातडीच्या पोलीस मदतीसाठी ‘११२’ या एकाच आपत्कालीन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी ‘चाइल्ड लाईन’च्या माधुरी शंभरकर यांनी बाल हक्क आणि बाल संरक्षण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुलांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय वा गैरप्रकार सहन न करता वेळेवर मदत कशी मागावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमास ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल व यशवंत विद्यालयातील एकूण ४५० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



