दुष्काळाने संकटात आलेल्या शेतकऱ्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी, चारा व पांदन रस्त्याला प्राधान्य _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
पालकमंत्र्यांची दिवाळी शेतकरी आत्महत्याग्रस्त व भटके विमुक्त जाती जमाती कुटूंबांसोबत

चांदा ब्लास्ट
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना पालकमंत्र्यांकडून सेंद्रीय खताचे वाटप ; पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल व जात प्रमाणपत्राचे वितरण
वर्धा :_ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कुटूंबांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत दिली. येणाऱ्या काळात दुष्काळाचा सामना करण्यासाठी पिण्याचे व सिंचनाचे पाणी, पांदन रस्ते व विज उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
सेलू तालुका प्रशासनाच्यावतीने भटके विमुक्त जाती जमाती कुटूंबांसोबत दिवाळी उत्सव व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना सेंद्रीय खत वाटप, दिवाळी फराळ किट, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुल व जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, सेलू नगरपंचायतच्या अध्यक्ष स्नेहल देवतारे, माजी अध्यक्ष राजेश जयस्वाल, प्रफुल खोडे, तहसिलदार डॉ.शंकुतला पाराजे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अनुपकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते.
कमी पर्जन्यमानामुळे भविष्यात शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्यानी शक्यता आहे. टंचाईचा सामना करण्यासाठी शासनाने नियोजन केले असून नागरिकांनी सुध्दा पाणी बचतीचे आतापासून नियोजन करावे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदनरस्ते ही एक मोठी अडचण होती. शासनाने राज्यातील पांदनरस्ते बांधन्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला असून जिल्ह्यातील 550 पांदन रस्त्यांचा यात समावेश आहे. राज्य शासन शेतकरी हा केंद्र बिंदू ठेवून वंचित, गरीब लोकांना न्याय देण्याचे काम करीत असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर पुढे बोलतांना म्हणाले.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसोबतच धाम, बोर प्रकल्पातून जास्तीत जास्त सिंचन शेतकऱ्यांना करता यावे यासाठी कालवा, पाटचाऱ्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी सेलू तालुक्यात विविध शिबिराचे आयोजन करुन 253 विविध प्रकारचे दाखले नागरिकांना वितरीत करण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
भारत हा कृषि प्रधान देश असून शेतकरी विकासाचा कणा आहे. तो शेतात सतत राबत असतो. त्यांच्या या संकटाच्या काळात शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे नगराध्यक्ष स्नेहल देवतारे म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्र्यांच्यावतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना सेंद्रींय खताचे वाटप करण्यात आले. सेलू नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थान प्रकल्पांतर्गत शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेल्या या सेंद्रीय खताला बाजारपेठ मिळावी व खताची जनजागृती व्हावी म्हणून पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी खत खरेदी करुन प्रती कुटूंब 200 किलो सेंद्रीय खत वितरीत केले. यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना आधार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत घरे मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाची चाबी व मंजूरी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्राचे वितरण तसेच दिवाळी फराळ किटचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी दिवाळी दिपक प्रज्वलीत करुन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार डॉ.शंकुतला पाराजे यांनी केले. संचलन मंडळ अधिकारी रमेश भोले यांनी केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



