पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली तूर पिकाची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : अलनिनोचा प्रभाव आणि कमी पर्जन्यमानामुळे यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. अशा स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. सेलू तालुक्यातील कोल्ही येथे तूर पिकाची पाहणी करतांना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सेलू तालुक्यातील कोल्ही येथे शेतकरी समीर शेख या शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पिकाची पालकमंत्री डॉ.भोयर यांनी पाहणी केली. कमी पर्जन्यमानामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर सर्व्हे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे. नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देखील शासन लवकरच जमा करणार आहे, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पालकमंत्री डॉ.भोयर यांनी तुरीची पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तालुका कृषि अधिकारी श्री.राऊत यांना तूर पिकाया होणाऱ्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, तहसीलदार डॉ शकुंतला पाराजे, तालुका कृषी अधिकारी श्री.राऊत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



