ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवा संकल्प अभियानांतर्गत उद्या जिल्हाभर अवयवदान शिबिर

जिल्हाधिकारी व सीईओंच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 शासकीय रुग्णालये, जिल्हा व तालुकास्तरावर आयोजन

वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यासोबतच योजनांची जनजागृती करण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत एकाच दिवशी दि.25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाभर अवयवदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी व मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ होईल.

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध विभागांच्यावतीने विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. अभियानात विविध सामाजिक उपक्रमांची देखील जोड देण्यात आली आहे. त्यानुसार या अवयवदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मृत्यूनंतर अवयवांचे दान केल्यास अनेक गरजूंना ते उपयोगी पडू शकतात. मागणीच्या तुलनेत अवयव कमी उपलब्ध होत असल्याने प्रत्येक गरजू व्यक्तीस अवयव उपलब्ध होत नाही. सामाजिक भावनेतून अवयवदान केल्यास मृत्यूनंतर अनेकांना दिलासा देण्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते.

दि.25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात अवयवदान उपक्रमाचा शुभारंभ होईल. जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय, तालुका स्तरावरील सर्व तालुका व उपविभागीय कार्यालयांसह जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अवयवदानासाठी संमतीपत्र भरून घेण्यात येणार आहे.

या शिबिरांमध्ये सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिक आपल्या अवयवदानाचे संमती पत्र भरून या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकतील. जिल्ह्यात जास्तीत जास्त संमतीपत्र भरून घेण्याचा प्रयत्न आहे. अवयवदान ऐच्छिक असले तरी नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व अवयवदानाचे संमतीपत्र भरून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये