ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वच्छतेसाठी काकबन ग्रामस्थांची एकजूट ; सामुदायिक श्रमदानातून गाव स्वच्छ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- ग्रामसभेत घेतलेला स्वच्छतेचा सामूहिक संकल्प अवघ्या एका दिवसात प्रत्यक्ष कृतीत उतरवत काकबन ग्रामस्थांनी ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थांच्या एकजुटीतून बुधवारी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमातून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हा संदेश देण्यात आला.

काकबन येथे २२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी २३ सप्टेंबरपासून संपूर्ण गावाची सामूहिक स्वच्छता करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.

ग्रामसभेतील या निर्णयाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुसऱ्याच दिवशी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. महिला, पुरुष आणि विविध घटकांतील नागरिकांनी सहभागी होत सामूहिक श्रमदानातून गाव स्वच्छ करण्याचा आदर्श निर्माण केला.

या स्वच्छता अभियानात कोटनाके ताई, सरपंच खडकीरायपूर, राज आत्राम (पोलीस पाटील), संतोष सलाम, मारु सोयाम, भीमराव कन्नाके (समाजसेवक), लिंगोराव सोयाम (मुख्याध्यापक, जि. प. शाळा, येरमी-येसापूर), संजय कोटनाके (ग्रा.पं. सदस्य), भारत कोटनाके यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

यावेळी लिंगोराव सोयाम, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, येरमी-येसापूर यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छ परिसरामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, गावाचे सौंदर्य वाढते तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक जाणीव निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासोबतच गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामस्वच्छता अभियानातून ग्रामस्थांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ही केवळ एखाद्या दिवसापुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, यासाठी नियमितपणे सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये