मच्छीमार संस्थांच्या अध्यक्षांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना (PMMSY) तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून मच्छीमार व मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध घटकांना उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांच्या अध्यक्षांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त (तांत्रिक) समीर डोंगरे यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. मत्स्यव्यवसायाचा विकास, मत्स्य उत्पादनात वाढ, मत्स्यपालनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन, मत्स्य विक्रीसाठी सुविधा तसेच मच्छीमारांना उपलब्ध होणारे अनुदान व आर्थिक सहाय्य याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
मच्छीमार सहकारी संस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प अहवाल, अर्ज प्रक्रिया आणि संबंधित विभागाशी समन्वय याबाबतही माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले. मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सहारे (ब्रह्मपुरी), सहाय्यक अधिकारी राहुल कोमावार, निबंधक सहकारी संस्था कार्यालय, चंद्रपूर तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यशवंत दिघोरे, चंद्रपूर जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष यादव मेश्राम आदी उपस्थित होते.
शिबिराच्या निमित्ताने नव्याने रुजू झालेले सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त (तांत्रिक) समीर डोंगरे मत्स्य विकास अधिकारी सहारे यांचा चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांच्या अध्यक्षांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासनाच्या मत्स्यव्यवसायविषयक योजनांची माहिती जाणून घेतली.



