रानडुकराच्या धडकेत चौघे गंभीर जखमी ; शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी
पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना जवळील गोंडपिपरी–खेडी मार्गावर अपघात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : चेकठाणेवासना गावाजवळ गोंडपिपरी–खेडी मार्गावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास रानडुकर अचानक रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. वन्यप्राण्यामुळे हा अपघात झाल्याने संबंधित जखमींना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण तेजराव ठेंगणे (वय २२, रा. चेकठाणेवासना) व लोकेश मनोज निखाडे (वय १६, रा. जैरामपूर) हे दुचाकीने जात असताना अचानक रानडुकराने त्यांच्या वाहनाला धडक दिली. याचवेळी समोरून येणाऱ्या सुभाष लटारू भोयर यांच्या वाहनाची भूषण ठेंगणे यांच्या वाहनाला धडक झाली.
या अपघातात भूषण ठेंगणे, लोकेश निखाडे, सुभाष लटारू भोयर (वय ३९, रा. भणार हेटी) आणि प्रतिमा सुभाष भोयर (वय ३१, रा. भणार हेटी) हे चौघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच चेकठाणेवासना येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चौघांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी चौघांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर केले.
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या अपघाताची दखल घेण्याची मागणी
रानडुकराच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याने जखमींच्या उपचाराचा खर्च आणि झालेल्या नुकसानीचा विचार करून वनविभाग व शासनाच्या लागू नियमांनुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या मार्गावर वारंवार वन्यप्राण्यांचा वावर होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.
जखमी चौघांनाही तातडीने योग्य उपचार मिळावेत आणि शासनाच्या नियमानुसार त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



