भद्रावती हत्याकांडातील मुख्य आरोपी श्रेयस पुल्लीला साखरवाई फाटा येथे अटक
नागमंदिर चौकातील हत्याकांडाचा तपास वेगाने ; वैभव पुल्ली व काका प्रकाश अण्णा पुल्ली यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील नागमंदिर चौकात बुधवारी सकाळी भररस्त्यात ४० वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपी श्रेयस पुल्ली याला पोलिसांनी साखरवाई फाटा येथून अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान वैभव पुल्ली आणि त्याचा काका प्रकाश अण्णा पुल्ली यांना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे हत्याकांडातील नेमका कोणाचा किती सहभाग आहे, याचा उलगडा करण्यासाठी पोलिस तपासाला आता वेग आला आहे.
या घटनेत उमदेव भावराव मेश्राम (वय ४०), रा. देऊरवाडा, भद्रावती, हल्ली मुक्काम शिवाजीनगर, प्रज्ञा वाचनालयाजवळ, भद्रावती यांचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, बांधकाम मजूर असलेले उमदेव मेश्राम हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मोटारसायकलने ठेकेदारीच्या कामावर जाण्यासाठी घरून निघाले होते. ते नागमंदिर चौक परिसरात पोहोचताच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मानेवर गंभीर वार झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ
हत्याकांडानंतर पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासातून संशयितांची नावे समोर आल्यानंतर वैभव पुल्ली आणि काका प्रकाश अण्णा पुल्ली यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी श्रेयस पुल्ली याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत श्रेयस पुल्ली याला साखरवाई फाटा येथून अटक करण्यात यश मिळविले. पोलिसांच्या या कारवाईमुळे हत्याकांडातील संशयितांचा शोध घेऊन त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
नेमका सहभाग तपासातून स्पष्ट होणार
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अथवा ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीची नेमकी भूमिका काय होती, हत्येचे कारण काय होते, हल्ल्याचे नियोजन कसे झाले आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः श्रेयस पुल्ली, वैभव पुल्ली आणि प्रकाश अण्णा पुल्ली यांच्यापैकी कोणाचा किती सहभाग आहे, याबाबतची वस्तुस्थिती पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती, संशयितांची चौकशी तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.
पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक
वर्दळीच्या नागमंदिर चौकात सकाळच्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयितांना ताब्यात घेतले आणि मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यामुळे पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची चौकशी आणि पुढील तपास सुरू असून, हत्याकांडामागील संपूर्ण घटनाक्रम, आरोपींच्या भूमिकांचा परस्पर संबंध आणि गुन्ह्याचा उद्देश याबाबत अधिक माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.



