राजुरा न्यायालयासमोरील हत्या प्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी
लोक अभिरक्षक कार्यालयाने पुरविली मोफत विधी सेवा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : राजुरा न्यायालयासमोरील टपरीवर बसलेल्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला.याप्राणघातक हल्ल्यात डोक्यात आणि छातीत गोळ्या लागल्याने विनोद ऊर्फ पापा जाधव राहणार सोमनाथपुर वाॅर्ड, राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचा मृत्यू झाला होता.त्या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालेली आहे.या गुन्हयाकामी दि.२३सप्टेंबर रोजी बुधवारी चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयात अटकेतील आरोपी अंकीत ऊर्फ भल्लासेठ मासीरकर वय २४ वर्षे धंदा. शेती राहणार चुनाळा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर यास राजुरा पोलीसांनी रिमांडकामाकरीता हजर केले होते.
अटकेतील आरोपी भल्लासेठ याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी आरोपीची न्यायालयीन कोठडी मिळावी असा रिपोर्ट न्यायालयात सादर केला.पोलीसांची विनंती मान्य करून विशेष मकोका न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे आरोपीची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.विशेष मकोका न्यायालयात आरोपीची बाजू लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे मांडत आहेत.



