इन्फंट काँन्व्हेंट येथे पालक-शिक्षक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद : नव्या कार्यकारिणीची निवड.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षक समन्वयावर भर.

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
आशिष रैच, राजुरा
राजुरा :_ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालक आणि शिक्षकांमध्ये सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने इन्फंट जीजस हायस्कूल, राजुरा येथे सीबीएसई व स्टेट हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने पालक-शिक्षक सभेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. सभेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, शिस्त, अभ्यासातील अडचणी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालकांनी संयुक्तपणे करावयाच्या प्रयत्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनीही विविध सूचना व अपेक्षा मांडत शाळेच्या शैक्षणिक व इतर उपक्रमांना सक्रिय सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक-शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सीबीएसई शाळेच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सौ. मंजुषा अलोने, उपाध्यक्षपदी परवेज शेख, सचिवपदी कु. वैशाली धानोरकर तर सहसचिवपदी सौ. नम्रता संदीप तुपट यांची निवड करण्यात आली. स्टेट हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सौ. सिमरनकौर भंगू, उपाध्यक्षपदी नावेद अन्सारी, सचिवपदी मेघा धोटे तर सहसचिवपदी सौ. गंगा शेंडे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळेच्या विकासासाठी सक्रिय सहभाग व सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सागर व मेघा धोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली धानोरकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


