ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लक्कडकोटमध्ये गृहभेटींसह आरोग्य तपासणी शिबिर

‘तिशीचा पल्ला–तपासणीचा सल्ला’ उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लक्कडकोट येथे गृहभेटी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘तिशीचा पल्ला–तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

उपक्रमादरम्यान, कीटकतज्ज्ञ डॉ. अनिकेत दाते, आरोग्य सहाय्यक जाधव, हिवताप नियंत्रक प्रदीप हरबडे, तालुका समूह संघटक सपना चांदेकर, गटप्रवर्तक सुजाता दूर्गे यांच्या समवेत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध भागांत गृहभेटी देत नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेत आवश्यक प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. विशेषतः तिशी ओलांडलेल्या नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांचे वेळीच निदान करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी वैद्य यांच्याकडून नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील उपचार व वैद्यकीय सल्ल्याबाबत माहिती देण्यात आली. आरोग्याबाबत निष्काळजीपणा न करता नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहनही करण्यात आले.

‘तिशीचा पल्ला–तपासणीचा सल्ला’ या उपक्रमातून आजाराचे निदान झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित तपासणीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. गृहभेटींमुळे घराबाहेर पडणे शक्य नसलेल्या नागरिकांनाही आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सेविका सुनीता गेडाम, आरोग्य सेवक अमोल कोरांगे, आत्राम, नलावडे, आशा सेविका मंगला रामटेके, वर्षा आडे, शोभा खारकर, सीमा कोरवते, चित्रक्षी काटकर यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती आणि प्रतिबंधात्मक तपासणीला चालना मिळत असल्याचे चित्र लक्कडकोट येथे दिसून आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये