योग सुवर्णपदक विजेत्या पूजा देऊळकरांच्या कथित अवमानावरून भद्रावतीत संताप
मुख्याधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले; निष्पक्ष चौकशी व CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी, पोलिसांत तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक पटकाविणाऱ्या भद्रावतीच्या योग शिक्षिका डॉ. पूजा देऊळकर यांच्या नगरपरिषद कार्यालयातील कथित अवमानाच्या प्रकरणावरून आज भद्रावतीत वातावरण तापले. काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आज अष्टांग योग समिती, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारत कथित प्रकाराचा निषेध केला.
अमित गुंडावार, भाजपाचे शहराध्यक्ष किशोर गोवारदिपे, उबाठाचे नरेश काळे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सरपटवार, प्रकाश कटलावार, शुभांगी झाडे, किशोरी कटलावार, युवा मोर्चाचे इम्रान शेख आदींनी मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांची भेट घेत डॉ. पूजा देऊळकर यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तनाबाबत सवाल उपस्थित केले. यावेळी उपस्थितांनी निषेधाच्या घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.
डॉ. देऊळकर या नगरपरिषदेत आयोजित योग व ध्यान उपक्रमासंदर्भात माहिती घेण्यासाठी कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी मुख्याधिकारी कक्षात त्यांचे म्हणणे पुरेशा गांभीर्याने ऐकून घेण्यात आले नसल्याचा तसेच त्यांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच संबंधित वेळेचे CCTV फुटेज सुरक्षित ठेवावे, अशी मागणी उपस्थितांनी केली.
दरम्यान, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी डॉ. देऊळकर यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप स्पष्टपणे फेटाळला. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामकाजाची घाई असल्याने त्यांना अपेक्षित वेळ देता आला नाही. त्यामुळे डॉ. देऊळकर यांना अपमान झाल्याचे वाटले असावे; मात्र त्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आपण त्यांना ‘गेट आऊट’ असे म्हटले नसल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनीही भूमिका मांडली. “घटनाक्रम सत्य असेल तर तो निश्चितच निषेधार्ह आहे. याबाबत मला पूर्वी माहिती असती तर पूजा देऊळकर यांच्यासारख्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूबाबत असा प्रकार घडू दिला नसता. अध्यक्ष म्हणून माझी कोणतीही दुजाभावाची भूमिका नाही,” असे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी दालनात कथित घटनेबाबत जाब विचारताना काही महिला व उपस्थितांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. उपस्थितांनी प्रशासनाकडून या प्रकरणाची स्पष्टता मागितली.
दरम्यान, कथित अवमान प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, जिल्हाधिकारी तसेच संबंधित लोकप्रतिनिधींकडेही दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित CCTV फुटेज सुरक्षित ठेवून ते तपासावे, डॉ. देऊळकर यांच्यासह मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवावेत आणि चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात डॉ. पूजा देऊळकर यांचा कथित अवमान झाल्याचा आरोप आणि मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांनी केलेले आरोपांचे खंडन अशा परस्परविरोधी भूमिका समोर आल्या आहेत.



