अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांची कारवाई
६.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करत एका ट्रॅक्टरसह एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवार, दि. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४० ते ५.२० वाजताच्या दरम्यान मोजा जमघट हॉटेलच्या मागे, गौतम नगर, भद्रावतीजवळ करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मांगली नाल्याकडून भद्रावती गावाकडे एका महिंद्रा कंपनीच्या लाल रंगाच्या YUVO 585 DI ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सापळा रचून ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली.
या कारवाईत ५ हजार रुपयांची एक ब्रास रेती, ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा महिंद्रा YUVO 585 DI ट्रॅक्टर आणि ७० हजार रुपये किमतीची लोखंडी ट्रॉली (हायड्रॉलिक जॅकसह) असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारत वसंत बोढेकर (वय २४) आणि समीर बंडू चौधरी (वय २४) या दोघांविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर,देवानंद डुकरे, प्रशांत शेंदरे, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, मनाली गारघाटे आदींचा सहभाग होता.



