इन्फंट काँन्व्हेंट येथे महावितरणकडून विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षा व स्वयंरक्षणाचे धडे

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
आशिष रैच, राजुरा.
राजुरा :_ इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस हायस्कूल, राजुरा येथे महावितरणच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘विद्युत सुरक्षेसोबत स्वयंरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक मार्गदर्शन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी राजुरा महावितरणचे सहाय्यक अभियंता मिथुन मेश्राम तसेच रोहित साखरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे महत्त्व, विद्युत अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
विविध दैनंदिन उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. निष्काळजीपणामुळे उद्भवणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यासोबतच स्वयंरक्षण, सतर्कता आणि जबाबदारीची भावना दृढ झाली.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजहर शेख सर यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



