ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी : आ. विजय वडेट्टीवार

ब्रम्हपुरीचा महाराजा गणेशोत्सवात ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी:- विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, संस्कार आणि मार्गदर्शन हे समाजासाठी अमूल्य असून, त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला प्रेरणा व दिशा मिळते, असे प्रतिपादन विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश उत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंचावर अनुसूचित जाती काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, सेवादल माजी अध्यक्ष विठ्ठल गुड्डेवार, डॉ.देविदास जगनाडे, प्रा.सुभाष बजाज, डॉ. नामदेव कोकोडे, काॅंग्रेस तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, काॅंग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, काॅंग्रेस प्रदेश सचिव डॉ थानेश्वर कायरकर, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर नगरसेवक पुष्पाकर बांगरे, राममोहन ब्राडीया, डि.के. मेश्राम यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच समाजाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यभर कष्ट करून समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे आवश्यक आहे. ज्येष्ठांकडे असलेला अनुभव हा कोणत्याही पुस्तकापेक्षा मोठा असतो. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ तरुण पिढीने घेतला पाहिजे.

आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत ज्येष्ठ नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक संवेदनशील असण्याची गरज आहे. कुटुंब आणि समाजाने ज्येष्ठांना सन्मानाची व आपलेपणाची वागणूक देत त्यांच्या अनुभवाला योग्य स्थान दिले पाहिजे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, त्यांनी जपलेल्या संस्कारांचा, मूल्यांचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव आहे, असेही त्यांनी सांगितले

ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढविण्यासोबतच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा समितीने सुरू ठेवली आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी ब्रम्हपुरी परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. सत्कार स्वीकारताना ज्येष्ठ नागरिकांनी समितीचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये