घरगुती वादातून तरुणाची हत्या
केशरवाही येथील घटना ; उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील केशरवाही येथे घरगुती वादातून काठीने मारहाण झाल्याने गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशिष भोयर (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, रुपेश भोयर (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. २१ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आशिष भोयर याचा त्याच्या आईसोबत घरगुती कारणावरून वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी रुपेश भोयर तेथे गेला. यावेळी आशिषने रुपेशसोबतही वाद घातल्याचे सांगण्यात येते. आशिषला समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला; यावेळी रुपेशने काठीने आशिषच्या पाठीवर मारण्याचा प्रयत्न केला असता काठीचा फटका त्याच्या डोक्याला लागला. यात आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला तातडीने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
आशिषची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दि. २२ रोजी त्याचा नागपूर येथे मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, सावली पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



