सहकार सप्ताहातून युवक-युवतींना बचत आणि कर्जाचे धडे
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चिंतामणी व कला_वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी थेट संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ सहकार सप्ताहाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा गोंडपिपरीच्या वतीने सहकार महर्षी स्व. बाबासाहेब वासाडे यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. यानिमित्त चिंतामणी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज तसेच कलावाणिज्य महाविद्यालयातील युवक-युवतींशी बँक कर्ज, बचत आणि आर्थिक नियोजनाबाबत (दि.२२) मंगळवारी थेट संवाद साधण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव आवेश खान पठाण, विभागीय कर्ज समिती अध्यक्ष उल्हास करपे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी युवक-युवतींनी बँकिंग व्यवस्थेचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय, उद्योग अथवा रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करण्यात आले. बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती देतानाच कर्ज घेताना परतफेडीची क्षमता लक्षात घेणे, हप्ते वेळेवर भरणे आणि कर्जाचा योग्य कारणासाठी वापर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उत्पन्नातील ठराविक रक्कम नियमितपणे बचत करणे, बचत खाते सक्रिय ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे तसेच आवर्ती ठेव आणि मुदत ठेवींचा उपयोग करण्याबाबतही माहिती देण्यात आली. डिजिटल बँकिंगचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
“आजची छोटी बचत ही उद्याच्या मोठ्या स्वप्नांची भक्कम पायाभरणी आहे. नियमित बचत आणि योग्य कर्जवापरातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर होतो,”असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा व्यवस्थापक वाय.एम.धोतरे, निरीक्षक राकेश मेश्राम, लिपीक साजन माडूरवार, हर्षल चिमूरकर, रोशन भोयर, स्वप्नील ढवस, मनोज मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
यावेळी चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन गिरिया, कला_वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य लता जांभूळकर, प्रा. सुनीता खाडे, प्रा. नंदकुमार ढवळे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.



