वढोलीतील आरोग्य शिबिरात ७८ नागरिकांची आरोग्य तपासणी
६ नव्या उच्च रक्तदाब रुग्णांचा शोध ; ‘निरोगी गाव’साठी आरोग्य विभागाची जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
नियमित आरोग्य तपासणी, आजारांचे वेळीच निदान आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार यामुळे अनेक गंभीर आजारांवर सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रण मिळविता येते. याच उद्देशाने आयुष्मान आरोग्य मंदिर उपक्रमांतर्गत वढोली येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात तब्बल ७८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणीत ६ नवीन उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित झाले.
आज, (दि. २२) मंगळवारी “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” तसेच “श्री गणेशाय आरोग्याचा अभियान” अंतर्गत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसंदर्भात विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या उच्च रक्तदाबाच्या सहा नव्या रुग्णांना पुढील उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय दोन कुष्ठरोग संशयित लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांना जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. आजार होण्याची वाट न पाहता नियमित आरोग्य तपासणी करणे, योग्य आहार घेणे, व्यायाम करणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे याबाबतही जनजागृती करण्यात आली.
या शिबिरासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी किरण टोंगे, के. आय. नवघरे, पौर्णिमा निमगडे, सुप्रिया बालुगवार, आशा वर्कर रुपाली कुळमेंथे, छबु आरेकर यांची उपस्थिती होती. नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



