सामदा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
चार दिवसांत दुसऱ्या गुराख्याचा बळी ; परिसरात भीतीचे वातावर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सावली तालुक्यातील सामदा-दागोबा परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यात ४७ वर्षीय गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. कक्ष क्रमांक १५o१ येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर गुराखी दररोजप्रमाणे आपली जनावरे चराईसाठी घेऊन सामदा-दागोबा परिसरात गेला होता. यावेळी कक्ष क्रमांक १५0१ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर गुराखी बेपत्ता झाल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तब्बल चार ते पाच तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात अवघ्या चार दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा बळी गेला होता. त्यानंतर पुन्हा गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याचा जीव घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावली तालुक्यात विविध भागांत वाघांचा वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, जंगलालगतच्या गावांमध्ये जनावरे चराईसाठी नेणाऱ्या गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.



