ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किराणा दुकानाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक!

_गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डीहेटी येथील घटना ; व्यापाऱ्याचे मोठे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डीहेटी येथे किराणा दुकानाला भीषण आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. संघराज तेलसे यांच्या मालकीच्या किराणा दुकानात रविवारी रात्री ही घटना घडली. या आगीत अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संघराज तेलसे हे किराणा दुकानाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महत्त्वाच्या कामानिमित्त ते कुटुंबासह औरंगाबाद येथे गेले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील किराणा माल, साहित्य व इतर वस्तू मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्या.

दुकानातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी सत्यशील पुणेकर व अमोल कुळमेथे यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.

मात्र, अग्निशमन यंत्रणेच्या प्रयत्नांपूर्वीच दुकानातील मोठ्या प्रमाणातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. त्यामुळे व्यापाऱ्याचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दुकानाला आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत. आगीचे कारण स्पष्ट झाल्यानंतरच घटनेमागील नेमके वास्तव समोर येणार आहे. या घटनेमुळे तेलसे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये