ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीतील नमो उद्यानाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह

अंदाजपत्रकाप्रमाणे काम नसल्याचा आरोप : निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती नगरपरिषद हद्दीतील भवानी माता (टेकडी) परिसरात सुरू असलेल्या नमो उद्यानाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नगरपरिषदेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रक व नकाशाप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन दि.२१ रोज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.

भवानी माता (टेकडी) परिसरात शासनाच्या निधीतून नमो उद्यानाचे काम सुरू होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, नगरपरिषदेने दिलेल्या अंदाजपत्रक व मंजूर नकाशानुसार प्रत्यक्ष काम होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अंदाजपत्रकानुसार २०० फूट बोअरिंग करणे आवश्यक असताना केवळ १५० फूट बोअरिंग करण्यात आल्याचा, तसेच बीम व पिल्लरच्या बांधकामात लोखंडी सळ्यांच्या वापराबाबतही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या कामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात नगरपरिषद सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतरही कामातील अनियमितता तसेच ठेकेदारामार्फत झालेल्या कथित चुकांबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर कामाची मुदत २ जुलै २०२६ रोजी संपलेली असतानाही काम अद्याप अपूर्ण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक, मंजूर नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकाम यांची तपासणी करण्यात यावी. काम निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून कामाची गुणवत्ता सुधारण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर सरिता सुर (गटनेता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुनील नामोजवार (माजी नगराध्यक्ष), अनिल पडोळे (नगरसेवक), प्रथम गेडाम (नगरसेवक), सौ. जयश्री दुर्योधन (नगरसेविका), उर्मिला साव (नगरसेविका), कल्पना भुसारी (नगरसेविका), सिमा पवार (नगरसेविका) आणि उषा जाधव (नगरसेविका) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री एकनाथशिंदे, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करणजी देवतळे तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद भद्रावती यांना देण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये