ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी वस्तीगृहातील आहारातून “नॉनव्हेज” गायब?

बकऱ्याचे मांस व गावठी चिकनच्या तरतुदीची अंमलबजावणीच नाही; _विद्यार्थ्यांना नियोजित आहारापासून वंचित ठेवल्याचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ आदिवासी विकास विभागाच्या शासकीय मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारातून नॉनव्हेज गायब झाल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाच्या आहार नियोजनानुसार विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये बकऱ्याचे मांस तसेच गावठी चिकन देण्याची तरतूद असताना, गोंडपिपरी येथील आदिवासी शासकीय वस्तीगृहात आतापर्यंत या आहाराची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहार मिळावा, यासाठी शासनाकडून विविध खाद्यपदार्थांचा समावेश असलेले आहार नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बकऱ्याचे मांस ठरावीक कालावधीत तसेच गावठी चिकन महिन्यातून दोन वेळा देण्याची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना हा आहार मिळत नसल्याने वस्तीगृहातील भोजन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनाकडून तरतूद व निधी उपलब्ध असताना संबंधित आहार प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ताटात येतो की नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे. आहार तक्त्यातील पदार्थ केवळ कागदावरच राहतात का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

*विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न*

वस्तीगृहात ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास असतात. त्यांच्या आरोग्यासाठी नियमित आणि पौष्टिक आहार मिळणे महत्त्वाचे आहे. शासनाने निश्चित केलेल्या आहार तक्त्यानुसार भोजन दिले जात नसेल तर त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

*चौकशीची मागणी*

वस्तीगृहात आतापर्यंत कोणत्या दिवशी कोणता आहार देण्यात आला, बकऱ्याचे मांस व गावठी चिकनसाठी किती तरतूद करण्यात आली, त्यासाठी किती खर्च करण्यात आला आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला का, याची संबंधित विभागाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत मी सविस्तर माहिती भेटूनच देतो. फोनवर याबाबत बोलणार नाही.

*ईश्वर तांगडे, गृहपाल, शासकीय मुलांचे वस्तीगृह गोंडपिपरी.*

“वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार जेवण मिळत नसल्याबाबत विद्यार्थ्यांची तक्रार आमच्याकडे आली आहे. आहार तक्त्यानुसार विद्यार्थ्यांना नियमित व पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे.”

*साईनाथ कोडापे, तालुकाध्यक्ष, अनुसूचित जमाती काँग्रेस गोंडपिपरी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये