ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुकुटबन–गडचांदूर नव्या रेल्वे मार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर  :_ महाराष्ट्रातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या औद्योगिक व खाण क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या मुकुटबन–गडचांदूर नव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. सुमारे ३८ किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गासाठी तब्बल ४९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या रेल्वे मार्गामुळे मुकुटबन (यवतमाळ) आणि गडचांदूर (चंद्रपूर) यांच्यात थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार असून प्रवासाचे अंतर, वाहतुकीचा वेळ आणि संबंधित खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यमान वर्धा–माणिकगड रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा पर्यायी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

मुकुटबन आणि गडचांदूर हे परिसर औद्योगिक व खाण क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले जातात. नव्या रेल्वे मार्गामुळे या औद्योगिक समूहांना अधिक सक्षम रेल्वे जोडणी मिळणार असून कोळसा, सिमेंट तसेच पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून दरवर्षी सुमारे ६० लाख टन मालवाहतूक होण्याची अपेक्षा असून, दोन्ही दिशांनी दररोज दोन मेमू रेल्वे गाड्या चालविण्याचे नियोजन आहे.

हा मार्ग कोळसा व सिमेंट उद्योग क्षेत्राला माजरी–नांदेड रेल्वे मार्गाशी थेट जोडणार असून मालवाहतुकीसाठी कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे कोळसा, सिमेंट आणि पोलाद उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीचा वेळ व खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या बल्हारशाह–नागपूर उच्च घनता रेल्वे मार्गावरील अवलंबित्व कमी करण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तुलनेने कमी रेल्वे जोडणी असलेल्या भागांना या प्रकल्पामुळे नवीन रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

मुकुटबन–गडचांदूर रेल्वे मार्गामुळे परिसरातील उद्योग, खाण व्यवसाय, मालवाहतूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये