स्थानिक रोजगारासाठी ८० टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी
के. व्ही. आर. आर. कंपनीला निवेदन; स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त व कामगारांना प्राधान्य देण्याची मागणी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा :- स्थनिक रोजगाराच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत के. व्ही. आर. आर. कंपनीकडे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना विदर्भ प्रमुख बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन हरबळे जिल्हाध्यक्ष कामगार सेना याचा उपस्थितीत कंपनीच्या प्रतिनिधींना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक रोजगार धोरणानुसार ८० टक्के स्थानिक आणि २० टक्के परप्रांतीय रोजगाराच्या तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. स्थानिक पातळीवर विविध प्रकल्प व उद्योग सुरू होत असताना परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विशेषतः स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त तसेच परिसरातील अनुभवी व कुशल कामगारांना त्यांच्या परिसरातील रोजगाराच्या संधींमध्ये योग्य प्राधान्य मिळावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. रोजगाराच्या संधी उपलब्ध असतानाही स्थानिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्यास त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार रोजगार प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून स्थानिकांना योग्य संधी देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना राजुरा विधानसभा संघटक संदीपभाऊ वैरागडे, प्रकाशभाऊ रंभाजी, तंटामुक्ती अध्यक्ष अश्विनीताई जयपूलकर, सागर पासूला, रवींद्रभाऊ ताजने, नितेश चौरे यांच्यासह स्थानिक कामगार उपस्थित होते.
स्थानिकांच्या हक्कासाठी मागणी
ही मागणी कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा परप्रांतीय कामगारांच्या विरोधात नसून, स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या रोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे हा यामागील उद्देश असल्याचे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक युवक व कामगारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी पुढील काळातही पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.



