सामाजिक वनीकरणाने वाढविलेल्या वृक्षांची महावितरणकडून कत्तल
कोठारी - तोहोगाव - लाठी मार्गावरील संतापजनक प्रकार ; पर्यावरण प्रेमीमध्ये नाराजी, चौकशी करून कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- तेलंगणा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका वन आणि वनसंपदेने नटलेला आहे. मात्र दिवसागणिक वाढत चाललेली वृक्षतोड आणि टोकाचा मानव – वन्यजीव संघर्ष गंभीर समस्या बनत आहे. यामुळे ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल आणि बिघडत चाललेला जीवनचक्र आव्हान ठरू पाहत आहे. यामुळे अधून मधून वन विभागाच्या सामाजिक वनीकरणाच्या मार्फतीने झाडांची लागवड आणि संगोपन केले जाते. यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च केले जातात.
मात्र ऐनवेळी मोठा संघर्ष करून वाढविलेले वृक्ष दिवसाढवळ्या कत्तल केले जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केली जात आहे. संताप जनक असलेला हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील कोठारी – तोहोगाव आणि लाठी मार्गावर दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
गोंडपिपरी तालुका हा वन व वनसंपदेने नटलेला आहे. या तालुक्यात औषधी वनस्पतीसह मौल्यवान आणि विविध प्रजातीची वृक्ष आणि फुलझाडे आहेत. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संगोपन केले जाते. यासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो.
मोठा संघर्ष करून सामाजिक वनीकरण विभाग वृक्षांची लागवड आणि संगोपन करतो. असेच वृक्ष लागवड आणि संगोपन तालुक्यातील कोठारी – तोहोगाव आणि लाठी मार्गावर सामाजिक वनीकरण विभागाने केले. या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे वृक्ष आज सौंदर्यात भर घालतांना दिसतात. असे असताना मात्र विद्युत वितरण कंपनीने कुठलीच परवानगी न घेता सामाजिक वनीकरण विभागाच्या या वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करण्याचा उद्योग चालविला आहे.
विद्युत वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक वनीकरणाच्या झाडांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू केला आहे. यामुळे या मार्गावरून ये – जा करणाऱ्या नागरिकात आणि पर्यावरणप्रेमीमध्ये नाराजी पसरली आहे. विनापरवानगी झाडांची कत्तल करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
सामाजिक वनीकरणाअंतर्गत या परिसरात वृक्षांची लागवड आणि संगोपन करण्यात आले. मात्र काही वर्षांपूर्वी ही झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात आली आहेत.
*सीमा तुराणकर, वनरक्षक,सामाजिक वनीकरण.*
शासनाचे लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली जाते. घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.
*_दिपक वांढरे,अध्यक्ष,निसर्ग सखा संस्था,गोंडपिपरी.*
रोडलगत विज वाहिनीचे पोल उभे केले जात आहेत. त्यासाठी अडसर ठरणाऱ्या झाडांची कत्तल केली जात आहे. रोडच्या ४० फुट दूरावर पोल उभे करायचे असताना अनेक ठिकाणी अवघ्या ५ ते ६ फुटावर पोल उभारले जात आहेत.



