पर्यावरणात फुलपाखरांचे महत्त्व मोठे_ वन परिक्षेत्राधिकारी रुंदन कातकर
कोठारी वनपरिक्षेत्रात ‘बटरफ्लाय वाल्क’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ मध्यचांदा वनविभागांतर्गत कोठारी वनपरिक्षेत्राच्या वतीने शनिवारी (दि. १९) ‘Butterfly Walk’ या विशेष निसर्ग व जैवविविधता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांमध्ये फुलपाखरांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे संवर्धन तसेच स्थानिक जैवविविधतेबाबत जागृती करणे, हा हेतू असून पर्यावरणात फुलपाखरांचे महत्त्व मोठे असल्याचे मत कार्यक्रमात बोलतांना वनपरिक्षेत्राधिकारी रुंदन कातकर यांनी व्यक्त केले.
मध्यचांदा वनविभागांतर्गत असलेला कोठारी परीक्षेत्र वन व वनसंपदेना नटलेला आहे. असे असताना या परिसराची जबाबदारी वन्यजीव अभ्यासक असलेल्या रुंदन कातकर यांच्याकडे नुकतीच आली. कोठारीचे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. अश्यातच शनिवारी (दि.१९) ‘Butterfly Walk’ या विशेष निसर्ग व जैवविविधता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांच्या मार्गदर्शनात झरण नर्सरी परिसरात जंगलभ्रमंती करून परिसरातील विविध अधिवासांमध्ये आढळणाऱ्या फुलपाखरांचे निरीक्षण करण्यात आले. विविध प्रजातींची ओळख, त्यांचे अधिवास, खाद्य वनस्पती, जीवनचक्र तसेच परागीभवन प्रक्रियेत फुलपाखरांची भूमिका याबाबत उपस्थित वन कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
फुलपाखरे निरीक्षणात २१ प्रकारचे फुलपाखरांचे निरीक्षण करण्यात आले. त्यात कॉमन क्रो, कॉमन रोज, क्रिमसन रोज, कॉमन मॉरमॉन, ग्रेट एगफ्लाय, प्लेन टाइगर, लेमन पॅन्सी, पिकॉक पॅन्सी, कॉमन जे, ग्रास येलो आदी फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश होता.
फुलपाखरे ही पर्यावरणाच्या आरोग्याची महत्त्वपूर्ण निदर्शक असून त्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक वनस्पतींचे संरक्षण, रासायनिक कीटकनाशकांचा मर्यादित वापर आणि नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमात वनविभागाचे कर्मचारी वनपाल गेडाम, ढुमणे, गेडाम, वनरक्षक शेख, रामगीरकर, साखरकर, बोडे, कावळे, घोळवे, प्रतापगीरवार यांचेसह वनमजूरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘फुलपाखरे वाचवा, जैवविविधता जपा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वनरक्षक शेख यांनी प्रयत्न केले.



