ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना खिचडी,पण स्वयंपाकघरच असुरक्षित!

देवलागुडा जि.प. शाळेची दुरवस्था; संरक्षण भिंत नसल्याने सापांचा वावर, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या देवलागुडा जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था समोर आली आहे. शाळेतील किचन शेड पूर्णतः मोडकळीस आले असून, याच जीर्ण शेडमध्ये विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनाची खिचडी शिजविली जात आहे. किचन शेडला तडे गेले असून खिडक्यांचीही व्यवस्था नाही. पावसाळ्यात छतावरील टिनपत्रांमधून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, शाळेला संरक्षण भिंतच नसल्याने शाळेच्या परिसरात सापांचा वावर वाढला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी शाळेतील किचनमध्ये साप आढळून आल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी कोणालाही इजा झाली नाही. मात्र, या घटनेनंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवलागुडा येथील या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवाराला संरक्षण भिंत नसल्यामुळे परिसरातून सरपटणारे प्राणी शाळेच्या आवारात येण्याचा धोका कायम आहे. त्यातच किचन शेडची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

*जीर्ण शेडमध्ये स्वयंपाक किती सुरक्षित?*

विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. मात्र, विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार करण्याची जागाच असुरक्षित असेल तर याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तडे गेलेल्या भिंती, खिडक्यांचा अभाव आणि गळणारे छत अशा परिस्थितीत स्वयंपाक केला जात असल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

*नवीन किचन शेडसह संरक्षण भिंतीची मागणी*

मोडकळीस आलेले किचन शेड तातडीने पाडून त्याठिकाणी नवीन व सुरक्षित किचन शेड उभारावे, तसेच शाळेच्या आवाराला संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास राठोड यांनीही या गंभीर समस्येकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पंचायत समितीच्या अगदी जवळ असलेल्या शाळेची अशी अवस्था असेल, तर ग्रामीण भागातील इतर शाळांच्या सुविधांचा प्रश्न किती गंभीर असेल, याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित बाब असल्याने नवीन किचन शेड व संरक्षण भिंतीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी जोर धरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये