३४ वर्षानंतर जिवतीतील वणी पोलिस कॅम्प बंद!
जवानांची जिवती पोलीस ठाण्यात बदली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- नक्षलविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला सशस्त्र पोलीस वणी कॅम्प (शिबिर) बंद करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश जारी केला आहे.
पोलीस ठाणे जिवती अंतर्गत येणारा हा सशस्त्र पोलीस कॅम्प नक्षल कारवायांवर प्रभावीपणे आळा घालण्यासाठी ८ जून १९९२ पासून अस्थायी स्वरूपात कार्यरत करण्यात आला होता. मात्र, शासनाच्या २९ जून २०२६ रोजीच्या निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्याचा नक्षलग्रस्त भाग म्हणून असलेला समावेश वगळण्यात आला आहे. तसेच सध्या या कॅम्पच्या कार्यक्षेत्रात नक्षलवाद्यांच्या हालचाली अथवा कारवाया आढळून येत नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर वणी कॅम्पची आवश्यकता राहिलेली नसल्याने तो अस्थायी स्वरूपात बंद करण्यात येत आहे. कॅम्पमध्ये नियुक्त असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस ठाणे जिवतीच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात येणार आहे. कॅम्प बंद करून तेथील सर्व अधिकारी व अंमलदारांना जिवती पोलीस ठाण्यात हजर करण्याचे तसेच संबंधित अभिलेख जिवती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कॅम्पचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या ताब्यातील शस्त्रे व दारुगोळा पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील शस्त्रागारात तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कॅम्प बंद करण्यात येत असला तरी परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने जिवती पोलिसांनी कॅम्प परिसरात नियमित गस्त ठेवावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असेही पोलीस अधीक्षकांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
नक्षलविरोधी मोहिमेतील महत्त्वाचे केंद्र म्हणून दीर्घकाळ कार्यरत असलेला हा कॅम्प आता बंद होत असल्याने जिवती परिसरातील पोलीस बंदोबस्ताच्या व्यवस्थेत बदल होणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पूर्तता अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



